मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

आपला मोबाईल हरवला,काळजी करू नका,बीड पोलिसांनी केले तीन वर्षांत २२४० मोबाईल नागरिकांना परत.

 हरवलेल्या मोबाईलसाठी केंद्रीय नोंदणी प्रणाली ठरली आशेचा किरण

बीड पोलिसांची प्रभावी कामगिरी; २०२६ मध्ये सप्टेंबरअखेर १,३३० मोबाईल शोधण्यात यश

बीड प्रतिनिधी -   मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचा समज नागरिकांनी ठेवू नये. तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांनी केले आहे. या प्रणालीच्या प्रभावी वापरातून बीड जिल्हा पोलीस दलाने २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत २,२४० हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत केले आहेत.

       या कामगिरीमुळे बीड जिल्हा पोलीस दलाची या प्रणालीवरील कामगिरी सातत्याने देशातील पहिल्या दहामध्ये राहिली आहे. सन २०२४ मध्ये १२४, सन २०२५ मध्ये ७८६, तर २०२६ मध्ये सप्टेंबरअखेर १,३३० मोबाईल शोधण्यात आले.

                  या प्रणालीद्वारे मोबाईलचा १५ अंकी उपकरण ओळख क्रमांक बंद करता येतो. त्यानंतर बंद केलेल्या मोबाईलमध्ये अन्य भ्रमणध्वनी क्रमांकाचे सिमकार्ड वापरण्याचा प्रयत्न झाल्यास उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना तपास करणे सुलभ होते.

        मोबाईल हरवल्यास प्रथम संबंधित सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड घ्यावे. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणीच्या संकेतस्थळावर जाऊन चोरीस गेलेला किंवा हरवलेला मोबाईल बंद करण्याचा पर्याय निवडावा. तक्रारीची प्रत, मोबाईल खरेदीचे बिल आणि शासकीय ओळखपत्राची प्रत सादर करून भ्रमणध्वनी क्रमांकाद्वारे मिळालेल्या एकवेळच्या संकेतांकाने पडताळणी करावी. अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या विनंती क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती तपासता येते.

      मोबाईल परत मिळाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठी संकेतस्थळावरील आवश्यक पर्यायाचा वापर करावा. मोबाईल खरेदी करताना त्याचा उपकरण ओळख क्रमांक तपासावा. संशयास्पद, काळ्या यादीतील किंवा बनावट क्रमांक असलेला मोबाईल खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

पाहणी दौऱ्यांचे 'नाटक' थांबवून दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्या; बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश

 

(नवनाथ डोळस- प्रतिनिधी)

बीड जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहेत. अशा संकटकाळात लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांकडून सुरू असलेले पाहणी दौरे म्हणजे निव्वळ 'नाट्य' असल्याची संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पावसाअभावी उद्ध्वस्त झालेल्या पिकांची आणि सोयाबीनच्या वाळलेल्या काड्यांची पाहणी करून वेळ घालवण्यापेक्षा सरकारने हे सोहळे तातडीने बंद करून दिवाळीपूर्वी सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी बीड जिल्ह्यातील बळीराजा करत आहे.

सोयाबीनच्या वाळलेल्या काड्या पाहून काय साध्य होणार?

जिल्ह्यात सर्वत्र तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद यांसारखी सर्वच पिके शेतातच करपून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. असे असतानाही रोज नवे मंत्री आणि लोकप्रतिनिधी जिल्ह्यात येऊन पाहणी दौऱ्यांचे केवळ देखावे करत आहेत. "शेतकऱ्यांच्या शेतातील वाळलेल्या सोयाबीनच्या काड्या पाहून मंत्री नेमके काय साध्य करणार?" असा रोखठोक आणि उद्विग्न सवाल स्थानिक शेतकरी विचारत आहेत.

पंचनाम्यांच्या नावाने वेळकाढूपणा थांबवण्याची मागणी

पाहणी दौरे आणि पंचनाम्यांच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा केला जात असून शासकीय यंत्रणांचा आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात पाऊस झालेला नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट असतानाही सरकार पाहणी दौऱ्यात वेळ का घालवत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कागदी सोपस्कारांत अडकण्यापेक्षा शासनाने खरी परिस्थिती ओळखून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

दिवाळीपूर्वी खात्यावर पैसे जमा करण्याची अपेक्षा

येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. एका बाजूला पिकांची झालेली धूळधाण आणि दुसऱ्या बाजूला बँक व सावकारांचे कर्ज यामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्यामुळे सरकारने पाहणीची नाटके तात्काळ बंद करावीत आणि कोणत्याही जाचक अटी न लावता संपूर्ण जिल्ह्यासाठी सरसकट मदत आणि पीक विमा दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी एकमुखी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

बीडच्या तीन खेळाडूंची रणजी क्रिकेट संघात निवड


डॉ.योगेश क्षीरसागरांसह बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून अभिनंदन

बीड (प्रतिनिधी) - दि. ४ : महाराष्ट्र रणजी संघात बीड जिल्ह्यातील तीन गुणवंत खेळाडूंची निवड झाल्याने बीडच्या क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०२६-२७ च्या रणजी हंगामासाठी सौरभ नवले, सचिन धस आणि ऋषिकेश सोनवणे या तीन खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

             एकाच वेळी बीड जिल्ह्यातील तीन खेळाडूंची रणजी संघात निवड होणे ही जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासातील अभिमानास्पद बाब मानली जात आहे. क्रिकेटच्या अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षणाच्या मर्यादा असतानाही या युवा खेळाडूंनी जिद्द, मेहनत, सातत्य आणि कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. या यशाबद्दल खेळाडूंच्या पालकांशी संपर्क साधून बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

नेकनूर येथील शेतकरी नितीन शिवाजी काळे यांनी पाच एकर शेतातील सोयाबीनची केली होळी

 नेकनूर प्रतिनिधी (शंकर काळे) - 

                  बीड तालुक्यातील नेकनूर परिसर आणि  शिवारामध्ये शेतकरी पडलेल्या दुष्काळामुळे हैराण आले असून नेकनूर येथील श्री. नितीन शिवाजी काळे यांनी स्वतःच्या पाच एकर शेतातील सोयाबीन नापिकीमुळे अक्षरश:होळी करून टाकली.त्यांचा मुलगा कापड दुकानावर काम करत आहे त्याच्या मालकाकडून एक लाख ते दीड लाख रुपये कर्ज  घेऊन सोयाबीनची पूर्ण मशागत केली होती, नांगरणीपासून ते  पेरणी फवारणी पर्यंत त्याला एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये लागले होते, आणि पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनला काही प्रमाणात शेंगा लागल्या होत्या परंतु अत्यल्प पावसामुळे त्या शेंगा भरल्याच नसल्याने त्यांनी आपल्या शेतातील सर्व पाच एक्कर मधील सोयाबीन जाळून टाकली आहे.  शेंगा आणि शेंगा मध्ये दाना काहीही नसल्यामुळे शेतकऱ्याने अक्षरशः सोयाबीन काढून त्या सोयाबीनची होळी केली आहे.शासनाने दुष्काळ जाहीर केला परंतु त्याची प्रत्यक्ष मदत शेतकर्यांना कधी मिळेल याच विवंचनेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.तरी शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती या शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.

आपला मोबाईल हरवला,काळजी करू नका,बीड पोलिसांनी केले तीन वर्षांत २२४० मोबाईल नागरिकांना परत.

 हरवलेल्या मोबाईलसाठी केंद्रीय नोंदणी प्रणाली ठरली आशेचा किरण बीड पोलिसांची प्रभावी कामगिरी; २०२६ मध्ये सप्टेंबरअखेर १,३३० मोबाईल शोधण्यात य...