हरवलेल्या मोबाईलसाठी केंद्रीय नोंदणी प्रणाली ठरली आशेचा किरण
बीड पोलिसांची प्रभावी कामगिरी; २०२६ मध्ये सप्टेंबरअखेर १,३३० मोबाईल शोधण्यात यश
बीड प्रतिनिधी - मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचा समज नागरिकांनी ठेवू नये. तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांनी केले आहे. या प्रणालीच्या प्रभावी वापरातून बीड जिल्हा पोलीस दलाने २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत २,२४० हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत केले आहेत.
या कामगिरीमुळे बीड जिल्हा पोलीस दलाची या प्रणालीवरील कामगिरी सातत्याने देशातील पहिल्या दहामध्ये राहिली आहे. सन २०२४ मध्ये १२४, सन २०२५ मध्ये ७८६, तर २०२६ मध्ये सप्टेंबरअखेर १,३३० मोबाईल शोधण्यात आले.
या प्रणालीद्वारे मोबाईलचा १५ अंकी उपकरण ओळख क्रमांक बंद करता येतो. त्यानंतर बंद केलेल्या मोबाईलमध्ये अन्य भ्रमणध्वनी क्रमांकाचे सिमकार्ड वापरण्याचा प्रयत्न झाल्यास उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना तपास करणे सुलभ होते.
मोबाईल हरवल्यास प्रथम संबंधित सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड घ्यावे. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणीच्या संकेतस्थळावर जाऊन चोरीस गेलेला किंवा हरवलेला मोबाईल बंद करण्याचा पर्याय निवडावा. तक्रारीची प्रत, मोबाईल खरेदीचे बिल आणि शासकीय ओळखपत्राची प्रत सादर करून भ्रमणध्वनी क्रमांकाद्वारे मिळालेल्या एकवेळच्या संकेतांकाने पडताळणी करावी. अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या विनंती क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती तपासता येते.
मोबाईल परत मिळाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठी संकेतस्थळावरील आवश्यक पर्यायाचा वापर करावा. मोबाईल खरेदी करताना त्याचा उपकरण ओळख क्रमांक तपासावा. संशयास्पद, काळ्या यादीतील किंवा बनावट क्रमांक असलेला मोबाईल खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा